अश्लीलतेच्या छायेत शक्तीतुरा; पारंपरिक जाखडीने जिंकले रसिकांचे मन देवेंद्र जाबरे कोकणच्या लोकसंस्कृतीत शक्तीतुरा आणि जाखडी या दोन लोककला विशेष मानाच्या आहेत. काळाच्या ओघात शक्तीतुरा कलेत झालेले बदल, वाढलेला वाद्यांचा गोंगाट आणि अश्लीलतेची छटा यामुळे अनेक रसिक या कलेपासून दूर जाऊ लागले आहेत. दुसरीकडे, पारंपरिक बाज जपत नव्या सादरीकरणातून उभारी घेतलेल्या जाखडी नृत्यकलेने मात्र रसिकांच्या मनात पुन्हा स्थान निर्माण केले आहे. चिपळूण आणि संगमेश्वर परिसरात जाखडीच्या कार्यक्रमांना मिळणारा वाढता प्रतिसाद हीच या लोककलेच्या पुनरुज्जीवनाची साक्ष ठरत आहे. जाखडीचा पुन्हा उमललेला सुवर्णकाळ एकेकाळी कोकणातील जत्रा, उत्सव आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये शक्तीतुरा कलेची मोठी लोकप्रियता होती. रात्रभर चालणाऱ्या या कार्यक्रमांसाठी गावोगावी गर्दी उसळत असे. मात्र काळानुरूप या कलेच्या सादरीकरणात मोठे बदल झाले. आधुनिक वाद्यांचा अतिरेक, परस्परांवरील टीका-टिप्पणी आणि काही ठिकाणी वाढलेली अश्लीलता यामुळे रसिकांच्या अपेक्षांमध्ये बदल झाला. याच काळात जाखडी नृत्यकलेने नव्या रूपात पुनरागमन केले. पारंपरिक ढंग कायम ठेवत आकर्षक सादरीकरण, कथानकाला साजेशी सोंगे आणि दर्जेदार गायन यामुळे जाखडीने रसिकांना पुन्हा भुरळ घातली आहे. लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा जाखडी हे केवळ नृत्य नसून कोकणातील लोकजीवन, ग्रामीण संस्कृती आणि सामूहिक एकतेचे प्रतीक आहे. स्तवन, गण, गवळण आणि पौराणिक कथांवरील पदांच्या माध्यमातून भक्ती, संस्कृती आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम या कलेत अनुभवायला मिळतो. चिपळूण तालुक्यातील खेरशेत-भाटलेवाडी येथून नव्याने सुरू झालेल्या जाखडी सादरीकरणानंतर आगवे, मांडकी, सावर्डे, खेरशेत आदी गावांतही या कलेला नवे व्यासपीठ मिळाले आहे. संगमेश्वर तालुक्यातही अनेक मंडळे ही परंपरा जोपासत आहेत. सोंगांच्या माध्यमातून कथांचा जिवंत अनुभव जाखडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कथेला साजेशा सोंगांचा वापर. गवळणीत श्रीकृष्ण, राधा, पेंद्या यांचे प्रवेश रसिकांना भावतात. श्रावणबाळाच्या गीतावेळी प्रत्यक्ष श्रावणबाळ आई-वडिलांना कावडीत घेऊन जात असल्याचे सादरीकरण केले जाते. त्यामुळे प्रेक्षक केवळ गाणे ऐकत नाहीत, तर कथा प्रत्यक्ष अनुभवतात. ही दृश्यात्मक मांडणी जाखडीला इतर लोककलांपेक्षा वेगळी ओळख मिळवून देते. लय, ताल आणि शिस्तीचा सुरेख मिलाफ जाखडीच्या सादरीकरणात एकसमान पारंपरिक वेशभूषा, ढोलकी-मृदुंगाचा ठेका, लयबद्ध पदन्यास आणि वेगवान गिरक्या हे मुख्य आकर्षण असते. कलाकारांचा एकसंधपणा आणि तालबद्ध हालचाली प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. विशेष म्हणजे या कलेत स्पर्धेपेक्षा समूहभावना आणि सांघिक सादरीकरणाला अधिक महत्त्व दिले जाते. शक्तीतुरापेक्षा जाखडीकडे वाढता ओढा लोककलेत बदल होणे स्वाभाविक असले, तरी दर्जा आणि संस्कार जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अनेक रसिकांच्या मते, काही शक्तीतुरा कार्यक्रमांमध्ये वाढलेली अश्लील भाषा आणि लज्जास्पद संवाद यामुळे कुटुंबासह कार्यक्रम पाहणे अवघड होत आहे. त्याउलट जाखडीमध्ये मनोरंजनासोबत भक्ती, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचा संगम दिसून येतो. त्यामुळे आयोजक आणि रसिक दोघांचाही कल या कलेकडे वाढत आहे. परदेशातही जपली परंपरा कोकणातून परदेशात स्थायिक झालेल्या समाजबांधवांनीही जाखडीची परंपरा जिवंत ठेवली आहे. मॉरिशसमध्ये ही कला ‘झाकरी’ या नावाने ओळखली जाते. आजही तेथील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या लोककलेचे सादरीकरण होत असून, कोकणी संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. तरुणाईचा वाढता सहभाग पूर्वी जाखडीमध्ये ज्येष्ठ कलाकारांचा अधिक सहभाग असे. आता तरुण कलाकारही या कलेकडे आकर्षित होत आहेत. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक नृत्यरचना आणि सांघिक सादरीकरणामुळे नव्या पिढीमध्येही या कलेबद्दल उत्सुकता वाढली आहे. लोककलेच्या संवर्धनाची गरज लोककला ही समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेचा महत्त्वाचा भाग आहे. जाखडीसारख्या कलांना शासकीय स्तरावर प्रोत्साहन, प्रशिक्षण शिबिरे, आर्थिक मदत आणि जिल्हास्तरीय महोत्सवांची आवश्यकता आहे. शाळा-महाविद्यालयांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत या कलेला स्थान मिळाल्यास पुढील पिढीपर्यंत हा अमूल्य वारसा सहज पोहोचू शकतो. ‘जुनं ते सोनं‘ पुन्हा सिद्ध लोककला बदलत्या काळानुसार विकसित होत असली, तरी तिचे मूळ संस्कार आणि शालीनता जपली गेली तरच ती टिकते. आज जाखडी नृत्यकलेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सिद्ध करतो की, ‘जुनं ते सोनं‘ ही म्हण आजही तितकीच खरी आहे. कोकणच्या मातीचा सुगंध, भक्तीचा भाव आणि लोकसंस्कृतीचे वैभव जपणारी जाखडी पुन्हा एकदा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागली आहे. Post navigation माझं मूल असं करणार नाही’… हा सर्वात धोकादायक भ्रम! चिपळूणचे मिलिंद मनोहर चितळे यांचे ९६वे रक्तदान; समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास